शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; आज, 5 डिसेंबर 2025 रोजी, महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘दुष्काळ निवारण प्रकल्पा’ला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) अंतर्गत ही योजना राबवली जाणार असून, याचा उद्देश दुष्काळाचा सामना करणाऱ्या गावांना आणि तेथील शेतकरी व नागरिकांना सक्षम बनवणे हा आहे. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून एकूण ₹174.10 कोटींचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, राज्यातील 5 जिल्ह्यांमधील 10 तालुक्यांतर्गत येणाऱ्या एकूण 90 गावांची निवड करण्यात आली आहे.
या योजनेसाठी निवडण्यात आलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये सातारा, अहिल्यानगर (अहमदनगर), नाशिक, धुळे आणि लातूर यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यामधून दोन दुष्काळी तालुक्यांची निवड करण्यात आली आहे, जसे की अहिल्यानगरमधून पारनेर व अहिल्यानगर, लातूरमधून जळकोट व औसा, नाशिकमधून येवला व नांदगाव, धुळ्यामधून सिंदखेडा व साक्री, आणि साताऱ्यामधून माण व खटाव. या निवडक गावांमध्ये पाण्याच्या उपलब्धतेसाठी विहिरी व सिंचन सुविधा निर्माण करण्यावर, तसेच नागरिकांना दुधाळ जनावरे पुरवून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
















