सरकारकडून कर्जमाफीचे नियोजन: फडणवीसांची ग्वाही, पण निकषांची तयारी!
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (२ डिसेंबर) मुंबईतील ‘सकाळ’च्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनावेळी शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचे विधान केले. शेतकरी कर्जमाफी हा सरकारसाठी महत्त्वाचा विषय असून, कर्जमाफी निश्चितपणे केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. मात्र, ही कर्जमाफी करताना बँकेंपेक्षा शेतकऱ्यांचा अधिक फायदा कसा होईल, याच्या नियोजनासाठी एक समिती काम करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
बँकांपेक्षा शेतकऱ्यांना फायदा कसा देणार?
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफीच्या पूर्वीच्या योजनांमध्ये (उदा. २०१७ आणि २०२० मध्ये केलेली कर्जमाफी) शेतकऱ्यांना नेमका किती फायदा झाला हे स्पष्ट होत नाही. उलट, कर्जमाफीचा फायदा बँकांना जास्त होतो, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला या दुष्टचक्रातून बाहेर काढून कर्जमाफीचा प्रत्यक्ष फायदा कसा देता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी कर्जमाफीचे नियम आणि निकष काय असले पाहिजेत, यावर सरकार विचार करत आहे.
आवश्यकता असलेल्या’ शेतकऱ्यांवर लक्ष.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी ‘संपूर्ण कर्जमाफी’ ऐवजी, ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीची आवश्यकता आहे, त्याच शेतकऱ्यांसाठी ही योजना तयार करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले. याचा अर्थ येणाऱ्या कर्जमाफीत काही अटी आणि निकष घातले जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून केवळ गरजू शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल.
वन्यप्राण्यांच्या संवर्धनामुळे वाढले संघर्ष.
राज्यात काही ठिकाणी वन्यप्राण्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. पूर्वी विदर्भामध्ये वाघांचा जास्त प्रकोप होता, परंतु आता तो पूर्व विदर्भामध्ये पाहिला मिळतोय. या वाढत्या संख्येचे कारण, मुख्यमंत्री म्हणाले, “गेली काही वर्ष वन्यप्राण्यांच्या संवर्धनाला प्राधान्य दिले, खूप कडक असे प्रकारचे नियम आणले आणि त्याचे संवर्धन केले”. याच संवर्धनामुळे त्यांची संख्या वाढली आहे.
मानवी संघर्षावर तोडगा काढण्याची गरज.
सध्या संख्या वाढली असली तरी त्यांचा नैसर्गिक अधिवास (आवास) वाढलेला नाही. त्यामुळे ‘झोन आणि बफर झोन’ याव्यतिरिक्त ‘तिथेही टायगर झोन’ तयार करावा लागेल. वन्यप्राणी जिथे राहतील, तिथे आवश्यक अशी इकोसिस्टीम (परिसंस्था) तयार करावी लागेल आणि सुरक्षित वातावरण निर्माण करावे लागेल, असे मत मुख्यमंत्र्यांनी वन्यप्राणी संघर्ष आणि अनुषंगाने बोलताना व्यक्त केले.