गहु फुटवे वाढीसाठी जबरदस्त उपाय, एका झाडाला लागेल 30 ते 40 फुटवे.
गव्हाच्या पिकामध्ये अपेक्षित आणि भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी जास्तीत जास्त फुटवे किंवा कल्ले निघणे अत्यंत आवश्यक आहे. जर फुटवे जास्त निघाले, तर ओंब्यांची संख्या वाढते आणि त्यामुळे आपल्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होते. गव्हामध्ये फुटवे काढण्याची किंवा कल्ले वाढवण्याची जी प्रक्रिया आहे, ती पेरणीनंतर साधारणपणे २० ते ३५ दिवसांदरम्यान सर्वाधिक होते. या कालावधीला ‘मुकुटमणी अवस्था’ (Crown Root Initiation – CRi) असे म्हणतात, आणि याच क्रिटिकल स्टेजमध्ये केलेले योग्य खत व्यवस्थापन पिकाला रेकॉर्ड ब्रेक फुटवे काढण्यास मदत करते.
बहुतेक शेतकरी पेरणीच्या वेळी बेसल डोस देतात आणि त्यानंतर केवळ युरियाचा वापर करतात, ज्यामुळे त्यांना पाहिजे तशा पद्धतीचे फुटवे मिळत नाहीत आणि उत्पादनात घट होते. त्यामुळे, गव्हाच्या पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिले पाणी देण्यापूर्वी, विशेषतः या मुकुटमणी अवस्थेत, एक चांगला खत व्यवस्थापनाचा फॉर्म्युला वापरणे अत्यंत फायदेशीर ठरते. हा फॉर्म्युला वापरल्यास गव्हामध्ये फुटव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
या अवस्थेत प्रति एकर खत व्यवस्थापन करताना खालील घटक वापरावे लागतात: २.५ ते ३ किलो ९८% शुद्ध दाणेदार ह्युमिक ॲसिड, १० ते १५ किलो डीएपी (१८:४६:०), २० किलो युरिया आणि ३० ते ३५ किलो एमओपी पोटॅश (जर तुम्ही पेरणीच्या वेळी पोटॅशचा वापर केला नसेल तर). लक्षात ठेवा की ह्युमिक ॲसिड दाणेदार स्वरूपातच घ्यावे, लिक्विड किंवा पावडर फॉर्म मधले ह्युमिक ॲसिड यासोबत वापरू नये.
ही चारही खते (ह्युमिक ॲसिड, डीएपी, युरिया आणि पोटॅश) सर्वप्रथम एका ठिकाणी व्यवस्थित एकत्रित मिसळून घ्यावी लागतात. त्यानंतर ही खते पाणी देण्याअगोदर शेतामध्ये समान प्रमाणामध्ये फेकून द्यावी आणि लगेच गव्हाच्या पिकाला पाणी देऊन घ्यावे. दाणेदार खते जमिनीत दिल्यानंतर लगेच पाणी दिल्याने ती पिकाला त्वरित उपलब्ध होतात.
या खत फॉर्मुल्याचे सर्वात मोठे फायदे म्हणजे पिकाच्या पांढऱ्या मुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि मुळे मजबूत व लांब होतात, ज्यामुळे फुटवे जास्त प्रमाणात निघतात. ह्युमिक ॲसिडमुळे पिकाची पोषक घटक शोषून घेण्याची क्रिया सुधारते, पिकाची वाढ जलद गतीने होते आणि पीक निरोगी राहते. तसेच, जमिनीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पुढे ओंबी अवस्थेत दाणा भरण्यासाठी याची चांगली मदत होते.
जर तुम्हाला हे दाणेदार खत व्यवस्थापन करणे शक्य नसेल, तर लिक्विड किंवा पावडर फॉर्म मधल्या ह्युमिक ॲसिड सोबत १२:६१:०० (मोनो अमोनियम फॉस्फेट) या विद्राव्य खताची फवारणी सुद्धा या मुकुटमणी अवस्थेमध्ये करू शकता. या फवारणीचे सुद्धा वाढ आणि फुटवे वाढीसाठी उत्तम परिणाम मिळतात.